मुंबई - निवडणुकांच्या कालावधीतच विरोधी पक्षातील नेत्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी केली जात असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ही सर्व चौकशी आकसाने केली जात असल्याचा आरोपही यावेळी चव्हाण यांनी केला.
ईडी आणि सीबीआय या सरकारी चौकशी संस्था आहेत. त्यांच्याकडून होत असलेल्या कारवाई पाहिल्या तर ठराविक लोकांवर ही कारवाई होताना दिसत आहेत. भाजप सरकार ५ वर्षाहून अधिक काळ दिल्लीत सत्तेत आहे. त्यामुळे ते आकसाने हे सर्व करत आहे. आता निवडणुका जवळ आल्या असल्याने या चौकशी वाढल्याचे चव्हाण म्हणाले.
आम्ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कितीतरी तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यात कुठेही ईडी आणि सीबीआय ही अॅक्शन घेताना दिसत नाही. त्यामुळे केंद्रातील सरकारकडून प्रत्येक संस्थेचा गैरवापर सुरू आहे. ज्याला इन्स्टिट्यूटशल कॅप्चर म्हणतात त्या, लोकशाहीच्या सर्व संस्था या लोकांनी हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे कायद्याप्रमाणे काम करण्याऐवजी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे काम केले जात आहे. हे फार धोकादायक असल्याचे चव्हाण म्हणाले.
सहकारी बँकांच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशावर ते म्हणाले की, मी यावर माहिती आत्ता घेत आहे. राज्य सहकारी बँकेवर कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मी त्या जजमेंटची कॉपी पाहतोय. त्यात नेमके काय म्हटले आहे, त्यातही काही ठराविक लोकांवर कारवाई केली जाणार आहे का? कोणावर करायची नाही, हे पाहावे लागेल असेही चव्हाण म्हणाले.
शिवसेनेने नुकतेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योग्य कार्यवाही होत नसल्याचे विधान केले आहे. त्यावर विचारले असता चव्हाण म्हणाले, की शिवसेनेची ही एक कायम स्टाईल आहे. ते कॅबीनेटमध्ये काही बोलत नाहीत आणि बाहेर येऊन लोकांना, आम्ही तुमचे कसे आहोत हे त्यांना दाखवायचे असते. जे मंत्रिमंडळात आहेत, त्यांनी सरकारमध्ये असताना लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यामुळे मंत्रिमंडळात न बोलता बाहेर येऊन बोलणे, हा शिवसेनेचा निव्वळ दांभिकपणा असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.