मुंबई- विधानसभा निवडणुकी बरोबरच सातारा लोकसभा पोटनिवडणूकीची घोषणा झाली आहे. युतीकडून उदयराजे भोसले मैदानात असतील हे जवळपास निश्चित आहे. मात्र, काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही त्यांच्या नावासाठी अनुकूल आहेत. मात्र, असे असले तरी पृथ्वीराज चव्हाण मात्र लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी अधिक इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच दगाफटका होण्याची त्यांना भिती असल्यानेच ते लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
उदयनराजें विरोधात माजी खासदार श्रीनिवास पाटलांना रिंगणात उतरवण्याची तयारी राष्ट्रवादीने केली होती. मात्र, ऐनवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे आहे. चव्हाण उभे रहाणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना समर्थन देईल अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली. त्यामुळे काँग्रेसने विधानसभेसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश करण्यात आलेला नाही. सातारा लोकसभेसाठी श्रीनिवास पाटील यांच्यासह शशिकांत शिंदे, रामराजे निंबाळकर यांचीही नावे चर्चेत आहेत.
सातारा लोकसभा मतदरासंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसचे स्वत: पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत. हे आकडे पाहीले असता आघाडीच्या उमेदवारासाठी सातारा लोकसभा निवडणूक जिंकणे सोपे आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण जर आघाडीचे उमेदवार असतील तर दगाफटका होवू शकतो असे चव्हाणांना वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक वेळा राष्ट्रवादीला अडचणीत येणारे निर्णय घेतले आहेत. त्यातीलच एक निर्णय म्हणजे महाराष्ट्र बँक बरखास्त करण्याचा आहे. शिवाय सिंचन घोटाळ्याची श्वेत पत्रिका काढण्याची घोषणा करून त्यांनीच अजित पवारांच्या अडचणी वाढवल्या होत्या. त्याच बरोबर २०१४ ची निवडणूकही स्वबळावर लढण्यासाठी चव्हाणच आग्रही होते. त्यांच्यामुळेच आघाडी तुटली असे राष्ट्रवादीचे नेते सांगतात.
हा इतिहास पाहिला असता राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिशोब चुकते केले जाऊ शकतात. एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची रणनिती राष्ट्रवादीची असू शकते अशी भिती चव्हाणांना वाटत असावी असे राजकीय विश्लेषकांना वाटते. चव्हाण लोकसभेत पराभूत झाल्यास त्यांना घरी बसावे लागेल. लोकसभा लढवल्यास विधानसभेचे दरवाजेही त्यांच्यासाठी आपोआप बंद होणार आहेत. या सर्व बाबींची कल्पना पृथ्वीराज चव्हाण यांना असावी. म्हणून त्यांचा कल हा विधानसभा निवडणूक लढवण्यावरच आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास ते सातारा लोकसभेच्या मैदानात उतरतील. मात्र, त्यांच्यासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षे पेक्षा निश्चित वेगळी असणार नाही.