मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.समृद्धी महामार्गाची अधिसूचना निघण्यापूर्वीच अनेकांनी मार्गाच्या लगत जमिनी कशा खरेदी केल्या? असा सवाल तारांकीत प्रश्नात उपस्थित केला होता. यावेळी ते बोलत होते.
अनेकांनी या मार्गाच्या लगत जमिनी कशा खरेदी केल्या? त्या जमिनी कुणाच्या नावावर आहेत, याची चौकशी करण्यात आली आहे का? या चौकशीत काय निष्पन्न झाले? हे प्रश्न चर्चेला आले नाही. मात्र, सरकारकडून आलेल्या लेखी उत्तरात समृद्धी महामार्गाची अधिसूचना जारी झाल्यानंतर झालेल्या जमीन खरेदीची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावरच चव्हाण यांनी आक्षेप घेतला असून अधिसूचना निघण्यापूर्वीच अनेकांनी त्या ठिकाणी जमिनी कशा घेतल्या? त्यांना या महामार्गाची दिशा आणि जाणारा मार्ग कुणी सांगितला याची चौकशी करणे अपेक्षित असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्याचबरोबर या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
याबाबत भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार करत चव्हाण यांनाच अधिक अभ्यासाची गरज आहे. त्यांचा अभ्यास कच्चा असल्यानेच त्यांना आता सभागृहात मागच्या बाकावर बसावे लागत असल्याचे शेलार म्हणाले.