नवी मुंबई - नवी मुंबई परिसरातील तळोजा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवून चक्क एका कैद्याने जेलमधून पलायन केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने सर्वत्र चांगलीचं खळबळ माजली आहे.
हत्येतील आरोपीचे जेलमधून पलायन -
भांडूप येथील एका अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी तळोजा जेलमध्ये कैदेत असलेला आरोपी संजय यादव (२८) याने तुरुंगातील सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवून एक दोन नव्हे, तर चक्क २५ फूट उंच भिंतीवरून उडी टाकून पलायन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कैदी संजय यादव हा भांडूप परिसरातील राहिवासी असून २०१८ मध्ये त्याने परिसरातील अल्पवयीन मुलाची हत्या केली होती. त्यामुळे त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती.
औषध घेण्याच्या बहाण्याने बॅरेकेटमधून बाहेर -
शनिवारी सकाळी ११च्या सुमारास संजय आणि त्याच्या बराकीतील राहुल जैस्वाल हे दोघेही औषध घेण्याच्या बहाण्याने बॅरेकेटमधून बाहेर पडले. त्यानंतर दोघेही कारागृहातील रुग्णालयाजवळ गेले असता, टेहळणी मचाणावर पोलीस सुरक्षा रक्षक नसल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे कैदी संजय व राहुल या दोघेही टेहळणी मचाणाचा दरवाजा उघडून वर चढले. त्यानंतर संजयने मनोऱ्याच्या २५ फूट भिंतीवरून उडी टाकली. यावेळी उडी टाकण्यास घाबरलेल्या राहुलला तैनात पोलिसांनी पकडले. मात्र, संजयचा माग काढण्यात पोलिसांना अपयश आले. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस कैदी संजय याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम - सतेज पाटील