मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू (BJP started Mission Mumbai Municipal Election) केले आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा दौरा : पुढील काही महिन्यांतच मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसह ठाण्यातील विकासकामांचे उद्घाटन झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने बीकेसी मैदानावर भाजपकडून जोरदार सभा घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समजते. याशिवाय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतही मोदींशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान ठाण्यात जाण्याची शक्यता? : दुसरीकडे ठाण्यामध्ये देखील पंतप्रधान जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष उपस्थित नाही राहिले तर ऑनलाईन तरी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
दाओसच्या परिषदेसाठी प्रश्नचिन्ह ? : 16 ते 20 जानेवारीदरम्यान दाओसला जागतिक आर्थिक परिषद होत आहे. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात त्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ जाणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान, काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे प्रोजेक्ट गुजरातला गेले असा वारंवार आहोप होत असल्याने शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत येण्याची शक्यता होती. मात्र, ती प्रतिमा पुसण्याचे काम या परिषदेच्या माध्यमातून सरकार करणार अशी दबक्या आवाजात राजकीय चर्चा सुरू झाली आहे अशी सुत्रांची माहिती आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत होणार : मात्र पंतप्रधान मोदी हे 19 जानेवारी रोजी मुंबईत येणार (PM Narendra Modi visit in Mumbai) असल्याचे वृत्त धडकल्याने दाओसच्या परिषदेसाठी शिंदे, फडणवीस यांनी कोणत्या तारखांना जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच 16, 17 जानेवारी रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत होणार आहे. फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर 19 तारखेच्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यामुळे दाओसला नेमके जायचे कधी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.