मुंबई - संपूर्ण विश्वात 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीला समृद्ध करण्यासाठी अनेक शिक्षक आणि प्राध्यापकांचे मोठे योगदान आहे. आज दुर्दैवाने अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी आणि हिंदी शाळेत टाकतात. त्यामुळे आपल्या मातृभाषेचे संरक्षण आणि संवर्धन करायचे असेल, तर सर्वांनी मिळून मातृभाषेत शिक्षण घेणे फार गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी दिली.
मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर -
भाषा संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पातळीवर मातृभाषा दिन साजरा केला जातो. राज्यात मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मराठी शाळांचे व शिक्षकांचे मोठे योगदान आहे. परंतु, आज महाराष्ट्रात याच मराठी शाळांतील शिक्षाकांना अनुदानासाठी झगडावे लागते आहे. फडणवीस सरकारने घोषित केलेले अनुदान महाविकास आघाडीने रोखून धरले आहे, ही मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शिक्षक सेल महाराष्ट्र प्रदेशाचे सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी दिली.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न -
जागतिक मातृभाषा दिवस असो किंवा मराठी भाषा दिन असो, हा एक दिवसीय साजरा करण्याचा दिवस नसून दैनंदिन आयुष्यामध्ये दैनंदिन व्यवहारांमध्ये मराठी भाषा वापरली गेली पाहिजे. आज अनेक क्षेत्र आहेत, जिथे मराठी भाषेचा वापर होत नाही. ज्या ठिकाणी मराठी बोलतात, त्याठिकाणी शंभर टक्के मराठी मातृभाषा वापर व्हायलाच पाहिजे. राज्य सरकारने मराठी भाषेच्या संरक्षण आणि संवर्धनांसाठी कायदे आणि नियम केलेले आहे. परंतु, त्याची आज कठोरपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून होताना दिसत नाही. तसेच महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या कारभारामध्ये सुद्धा शंभर टक्के मराठी भाषा वापरली जात नाही. त्यामुळे सर्वस्तरातून मराठी भाषेचा वापर व्हावा, याकरिता प्रयत्न करणे फार गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया जागतिक मातृभाषा दिनानिमित्त मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - स्वराज्य शिलेदारांच्या स्मृती, तरुणांनी केले ऐतिहासिक वीरगळींचे संवर्धन