मुंबई - मान्सूनची चाहूल लागली की मुंबईत पाऊस पडायला सुरूवात होते. गेल्या 24 तासात शहर विभागात 25.29 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 6.57 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 13.77 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली. तर मुंबईत आज ढगाळ वातावरण राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच थंड वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
24 तासातील पाऊस
मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली होती. त्यानुसार मुंबईत काल दिवसभरात विश्रांती घेत पाऊस पडला. काल 7 जून रात्री आणि आज पहाटे पाऊसाने पुन्हा हजेरी लावली. यामुळे 7 जूनच्या सकाळी 8 वाजल्यापासून ते 8 जूनच्या सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात शहर विभागात 25.29 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 6.57 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 13.77 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली.
आजच्या पाऊसाची आकडेवारी मुंबईत आज 8 जून रोजी पहाटे 5 ते 6 वाजेपर्यंत शहर विभागात 36 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली. पश्चिम आणि पूर्व उपनगरात हलका पाऊस पडल्याची नोंद झाली. या एका तासात मुंबई शहरात नरिमन पॉईंट येथे 33 मिलिमीटर, हाजी अली पंपिंग स्टेशन येथे 20 मिलिमीटर, महापालिका मुख्यालय येथे 18 मिलिमीटर तर नायर रुग्णालय येथे 13 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली. सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत शहर विभागात जी साऊथ वॉर्ड येथे 14 मिलिमीटर, पूर्व उपनगरात चेंबूर फायर स्टेशन येथे 22, एम वेस्ट कार्यालय येथे 14, पश्चिम उपनगरात अंधेरी के ईस्ट वॉर्ड येथे 30, के वेस्ट अंधेरी फायर स्टेशन येथे 16 तर एच वेस्ट वॉर्ड येथे 13 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली.
वाहतूक सुरू
पाऊसाने मुंबईत काल हजेरी लावली आहे. तरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नसल्याने रेल्वे व रस्ते वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
हेही वाचा- यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रसमध्ये मुसळधार पाऊस