मुंबई - कोल्हापूरी चप्पल जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, तिला मिळणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस कमी होत आहे. कमी झालेला प्रतिसाद वाढावा, यासाठी जेजे इंस्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्समध्ये चौथ्या वर्षाला शिकणाऱ्या इंद्रजीत महाजनने एक व्ही कारचे मॉडेल तयार केले आहे. भविष्यात या कारच्या माध्यमातून कोल्हापुरी चप्पलेची पूर्ण महाराष्ट्रात जाहिरात करण्याचा त्यांचा मानस आहे.
इंद्रजीत हा मूळाचा कोल्हापूरचा असून त्याच्या कुटूंबीयांचे कोल्हापूरी चपलेचे दुकान आहे. जेजेमध्ये शिक्षण घेऊन इंद्रजीतला कोल्हापुरी चपलेच्या प्रसिद्धीसाठी काही तरी करायचे आहे. जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्स महाविद्यालयात दरवर्षी कलाप्रदर्शन भरवण्यात येते. यंदा या प्रदर्शनाचे ८४ वे वर्ष आहे. या वर्षीही अनोख्या देखण्या कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात इंद्रजीतने एका राजेशाही विंटेज कारची कलाकृती तयार केली आहे. या कारमध्ये त्याने कोल्हापुरी चप्पलेचा डिस्प्ले लावला आहे. यामध्ये वेगवेगळ्या कोल्हापुरी चप्पल ठेवण्यात आल्या असून ही कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
कलाप्रदर्शनात कोल्हापुरी चप्पलची जाहिरात करणारी कार तयार केली आहे. कोल्हापुरी चप्पलेची योग्य ब्रॅडिंग होत नाही, त्यासाठी काही तरी करायचे होते. मी एक विंटेज कार तयार केली. यामध्ये कोल्हापुरी चपलांच्या वेगवेगळ्या ७ चप्पल बनवण्यात आल्या आहेत. या गाडीमध्ये सगळी डिझाईन ही रॉयल पद्धतीने तयार केली आहे. कोल्हापुरी चप्पल ही पारंपरिक समजली जाते, म्हणून त्याला रॉयल टच दिला आहे. ही कार बनताना त्याचा कलर आणि त्यातील वस्तूचा बारकाईने विचार केला आहे. ही कार बनवण्यासाठी अडीच महिन्याचा कालावधी लागला आहे. घरचा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही कार रस्त्यावर आणणार असल्याचे इंद्रजीतने सांगितले.