मुंबई - सरकारच्यावतीने बैठक घेणं, चर्चा करणे हे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. राज्य सरकारच्यावतीने मराठा समाज उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहात आज बैठक घेण्यात येत असल्याने त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणा प्रश्नी राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना पत्र देण्यात आल्यानंतर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यानंतर आता आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आपल्या हालचालीत वाढविल्या आहेत. राज्य सरकारच्यावतीने मराठा समाज उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहात आज बैठक घेण्यात येत असल्याने त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.
यावेळी ते म्हणाले, 'मराठा समाज आरक्षण प्रश्नी भाजपकडूनही बैठक घेतली जाणार आहे. सरकारच्यावतीने जी बैठक घेतली जात आहे. हे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविण्याची वृत्ती प्रवृत्ती दिसते. कारण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण होते त्यावेळी बैठक घेणे गरजेचे होते. मात्र, तसे केली गेले नाही. आता भाजपकडून पाच लोकांची समिती गठीत केल्यानंतर आरक्षण प्रश्नी बैठकीचे सुरू करण्यात आल्यानंतर आता आपण मागे राहायला नको, या अविर्भावातून त्यांची बैठक होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा - मराठा आरक्षण : देवेंद्र फडणविसांनी बोलाविली भाजप नेत्यांची बैठक
भाजप मराठा समाजाच्या पाठीशी -
देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. उच्च न्यायालयात ते टिकून दाखवले गेले. त्यानंतर कुठेही सर्वोच्च न्यायालयाने याला आव्हान दिल नव्हते. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार आरक्षणाच्या प्रश्नी कमी पडले. म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची आज बैठक होत आहे. यात फडणवीस एक अहवाल सादर करणार आहेत. असे दरेकर यांनी सांगितले. यामुळे भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.