मुंबई- संजय राऊत यांनी आज 'सामना'च्या अग्रलेखात जे म्हटले आहे. जी भाषा वापरलेली आहे. ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात ज्या पक्षाचे सरकार आहे. त्या पक्षाचे संजय राऊत हे प्रमुख नते आहेत. यातच ते संसदेचे प्रतिनिधी आहेत. ज्या वेळेला आपल्या देशाचा प्रमुख आणि संसदेचा प्रमुख देशवासीयांच्या एकजुटीसाठी अशा प्रकारची भूमिका घेत आवाहन करतो. त्या वेळेला एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून असे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे, असे आजच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी केलेल्या टिकेवर बोलताना, प्रवीण दरेकर म्हणाले.
हेही वाचा- 'बिग बीं'नी शेअर केली ९ वाजून ९ मिनीटांची 'फेक' सॅटेलाईट इमेज, नेटकऱ्यांचा संताप
देशात कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती महाभयंकर असताना, राजकीय अभिनिवेश बाळगून बोलणे हे संयुक्तिक वाटत नाही. पानिपतच्या लढाईचा उल्लेख करुन आपण कोरोनाशी लढण्यासाठी अपयशी ठरत आहोत की काय? अशा प्रकारची दुर्दैवी भावना राऊत यांनी व्यक्त केली. मात्र, यावेळी देशवासियांना धीर देण्याची गरज आहे. पण संजय राऊत या परिस्थितीत राजकीय उणीधूणी काढत आहेत, असे दरेकर म्हणाले.
नेमका काय आहे अग्रलेख-
नागरिकांनी शिस्त पाळायलाच हवी असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. ठाकरे हे लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशारीतीने संवाद साधत आहेत. कोरोनाशी जे युद्ध सुरू आहे त्या युद्धात लढण्यासाठी अशाच सेनापतीची गरज आहे. पानिपतच्या युद्धात आपला पराभव झाला होता तो अफवा, नियोजनशून्यता यामुळे. कोरोना युद्धाची स्थिती ‘पानिपत’सारखी होऊ नये. जनतेचा सदाशिवराव भाऊ होऊ नये. हाती मशाली आहेत. त्यात स्वत:चेच कपडे जळू नये. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगावे. जे सांगितले तेच घडावे. उलट वागणाऱ्यांना अद्दल घडवावी. फक्त `मरकझ' वालेच नियम मोडतात असे नाही! मरकझवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत.