मुंबई- जानेवारी पासून मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुंबईत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून बलात्कार, दरोडे, खून यासारख्या घटना घडत आहेत. सामान्य जनेतेचे जीवन असुरक्षित झाले आहे. असे असताना नाईटलाईफचा घाट कोणाचे बाल हट्ट पुरविण्यासाठी घेतला जात आहे?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
हेही वाचा- मी फक्त माझं मत मांडले होते आणि माझ्या मतांवर मी आजही ठाम आहे - योगेश सोमण
मरिन ड्राईव्ह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ अशा उच्चभ्रू वस्तीत नाईट लाईफ सुरू करण्याची सरकारची योजना असली तरीही 24 तास सातही दिवस चालणाऱ्या लाईफमुळे मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेवर ताण येणार आहे. महाराष्ट्र पोलिसांचे संख्याबळ आताच कमी आहे. पोलिसांवर आधीच नियमित कामाचा ताण-तणाव आहे. त्यातच नाईट लाईफ सुरू केल्यास पोलिसांच्या कामावर अधिक तणाव निर्माण होईल. त्याचा परिणाम मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर होईल, अशी चिंताही दरेकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रामध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांचे सातबारा कोरा करण्याची भाषा करणारे सरकार आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून नाईटलाईफ वाल्यांचे चोचले पुरविण्याठी प्राधान्य देण्यात मश्गुल आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.