मुंबई - पुलवामाच्या घटनेनंतर भारत सरकारने पाकला जशास तसे प्रत्युत्तर दिले, ही चांगली गोष्ट आहे. सरकारच्या धोरणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, मागील सर्जिकल अटॅक प्रमाणे भारताने एवढ्यावरच थांबू नये. सध्या पाक आर्थिक अडचणीत आहे. त्याची चोहोबाजूंनी कोंडी करावी. त्या दृष्टीने योग्य ती पावले सरकारने तातडीने उचलावीत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानवर अशा पद्धतीने हल्ला चढवावा की पाकचा ताबा संयुक्त राष्ट्र संघांच्या फौजांनी घेतला पाहिजे. तसे झाले तरच जगात आपला दबदबा वाढेल आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आपला सर्वांत मोठा विजय ठरेल, असेही आंबेडकर म्हणाले.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी ठार केल्याची सूत्रांनी अधिकृत माहिती दिली आहे. १२ 'मिराज-२०००' लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे ३ तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.