मुंबई - चौदा दिवस उलटून गेल्यानंतरही सत्ता स्थापन न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधानसभेचा कार्यकाळ 8 नोव्हेंबरला संपत आहे. मात्र, कोणत्याच पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नसल्याने राज्यात संविधानिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. हे रोखण्यासाठी राज्यपालांनी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
हेही वाचा - ...मग हे जनतेला दिलेला शब्द कसे पाळतील? - जयंत पाटील
मागील विधानसभा ही 8 नोव्हेंबर 2014 ला अस्तित्वात आल्याने तिचा कार्यकाळ ही याच दिवशी संपणार म्हणजे उद्या संपणार आहे. मात्र, निवडणूक निकालानंतर कोणत्याच राजकीय पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने तसेच कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने राज्यात मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे.
हेही वाचा - राष्ट्रपती राजवट लावण्याचे पाप सेना-भाजप करत आहे - धनंजय मुंडे
भारतीय संविधानातील कलम 172 अनुसार 2014 ला निवडून आलेल्या आमदारांचा आणि विधानसभेचा कार्यकाळ हा 8 नोव्हेंबर 2014 पासून सुरू झाला असून तो 5 वर्षानंतर याच दिवशी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणे गरजेचं आहे. राज्यात कोणताही संवैधानिक पेच प्रसंग उभा राहू नये यासाठी राज्यपालांनी योग्य ती पावलं उचलावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.