मुंबई - देशातील बिघडलेली अर्थव्यवस्था लपवण्यासाठी भाजप सरकारने एनआरसी आणि सीएए ही विधयके आणली आहेत. या विधयेकामुळे 40 टक्के हिंदू बाधित होणार असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकार चालवण्यासाठी केंद्राकडे निधी नाही. 28 फेब्रुवारीपर्यंत सरकार चालवण्यासाठी निधी जमा होईल का? याचा खुलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
अनेकांना आपला बाप कुठे मेला, हे सुद्धा माहीत नाही. मग ही कागदपत्रे द्यायची कोठून, असा सवालही आंबेडकर यांनी केला. जे या सरकारला विरोध करत आहेत, त्यांचे नागरिकत्व काढण्याचा डाव आहे. हा लढा पुढे घेऊन गेले पाहिजे. जे जे संविधान मानणारे आहेत, त्यांची जागा 'डिटेंशन कॅम्प'मध्ये आहे. लढता येऊ नये म्हणून हे सरकार असले उद्योग करत आहे. या सरकारने देशाची अर्थव्यवस्था संपवली असल्याचे आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांचा थेट मोदींवर आरोप
मोदी सरकारने महाराष्ट्राची राजधानी मुंबई जवळ दोन डिटेंशन कँप तयार केले असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात कुठेही डिटेंशन कँप नसल्याचे नुकतेच दिल्लीतील सभेत सांगितले होते. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई जवळ दोन कँप असल्याचे सांगून मोदींना थेट आव्हान दिले असल्याचे मानले जात आहे. माध्यमांनी या डिटेंशन कँपमध्ये जाऊन त्याचे रिपोर्टिंग केले पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले आहे.
वंचितची निदर्शने
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी) याविरोधात दादर येथे निदर्शने केली. या निदर्शनामध्ये आदिवासी, भटके विमुक्त त्यांच्या परंपरिक वेशात आणि वाद्यांसह उपस्थित होते. लहान मुले देखील सीएए आणि एनसीआर विरोधातील फलक घेऊन या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.
'सरकार पाडा अन्यथा डिटेंशन कँपमध्ये जा!'
अॅड. आंबेडकर म्हणाले, मोदी सरकारला धोबीपछाड दिल्याशिवाय आम्ही राहाणार नाही. सर्वच नागरिकांनी या कायद्याला विरोध केला पाहिजे. डिटेंशन कँपमध्ये जायचे नसेल तर या सरकारला झोपवायची तयारी केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे.
५ वर्षानंतर या सरकारला धोबीपछाड केल्याशिवाय राहणार नाही. डिटेंशन कॅम्पला जायचे नसेल तर या सरकारला झोपवायची तयारी केली पाहिजे. मुंबईलगत दोन डिटेंशन कॅम्प आहेत. जे या कायद्याविरोधात लढणार आहेत. त्यांना आम्ही पाठींबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.