मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाबाहेर अॅड. प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांच्या विद्यार्थी संघटनांनी विविध प्रश्नांवर दोन वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आज निदर्शने केली. दोन्ही बंधू विद्यार्थ्यांच्याद्वारे प्रशासनाला घेरत असल्याची चर्चा आहे.
प्रकाश आंबेडकर यांची सम्यक विद्यार्थी आंदोलन तर आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न केला.
सम्यक विद्यार्थी आंदोलनामार्फत १३ पॉईंट रोस्टर प्राध्यापक भरती प्रक्रिया पद्धतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राची स्वतंत्र इमारत त्वरित उभारावी आणि पीपल्स एज्युकेशनकडून ५ प्राध्यापकाची होणारी अडवणूक थांबवून या प्राध्यापकांना मान्यता द्यावी, यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेना आमरण उपोषणाला बसली आहे.
या अगोदर असलेल्या २०० पॉईंट रोस्टरच्या नुसार प्राध्यपकांची भरती होत होती. त्यानुसार भरती प्रक्रियेत एससी, एसटी, ओबीसी, एनटी प्रवर्गातील प्राध्यपकांच्या योग्य प्रमाणात भरती होत होती. किमान २ जागा जरी भरावयाच्या असल्यास त्यापैकी १ जागा ओपन प्रवर्गाला होती. तर २ री जागा ही एससी प्राध्यापकासाठी होती. त्यामुळे सम प्रमाणात जागा भरल्या जात होत्या. परुंतु १३ पॉईंट रोस्टर प्रमाणे मागसवर्गीयांचे प्रतिनिधित्व कमी करण्याची ही पध्द्त आहे, असा आरोप संघटनेने केला. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच प्राध्यापकाची निवड करा, अन्यथा आणखी मोठे आंदोलन उभारू, असे सम्यक आंदोलनाचे नेते अक्षय गुजर यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राची स्वतंत्र इमारत व्हावी, यासाठी अनेक वर्षांपासून रिपब्लिकन सेना आंदोलन करत आहे. तीन कुलगुरू बदलले पण इमारतीचा प्रश्न काही सुटला नाही . आतापर्यत ४० लाखाची तरतूद विद्यापीठाच्या बजेटमध्ये केली आहे. तरी अजून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. हा प्रश्न १४ एप्रिल आधी मार्गी लागावा, यासाठी आमरण उपोषणाला बसलो आहे. तरीही हा प्रश्न सुटला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू, असे रिपब्लिकन सेनेचे आशिष गाडे यांनी सांगितले.