'राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर मुंबईकडे आमचे दुर्लक्ष झाले' - मुंबई
'राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे. हे करताना शहरातील लोकांसाठी काम करण्यासाठी आपण कमी पडलो. आता ही उणीव आम्हाला भरून काढायची आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करून मुंबईत एक ताकदीची जाणीव करून द्यायची आहे' असा निर्धार माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय पक्ष म्हणून स्थापना झाल्यानंतर मुंबईचे मोठे योगदान होते. आमची राज्यात अनेक वर्षे सत्ता होती. यादरम्यान आम्ही जसे ग्रामीण भागातील प्रश्नांकडे लक्ष दिले, त्याप्रमाणे मुंबईकडे देता आले नाही, अशी कबुली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज मुंबईत दिली. एनआरसी आणि सीएएबाबत सर्व गोष्टींचा नीट अभ्यास केल्याशिवाय आम्ही निर्णय घेणार नाही, ही आमची भूमिका स्पष्ट असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मुंबईतील चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर 'मिशन २०२२ मुंबई' या कार्यकर्ता शिबिराचे उद्धाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी पटेल बोलत होते. या कार्यक्रमात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र वर्मा, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार किरण पावसकर, राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार माजीद मेमन, माजी आमदार पंकज भुजबळ आदी नेते उपस्थित होते.
हेही वाचा - शाहीन बाग आंदोलन परिसरात जमावबंदी लागू; कडेकोट पोलीस बंदोबस्त
'राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे. हे करताना शहरातील लोकांसाठी काम करण्यासाठी आपण कमी पडलो. आता ही उणीव आम्हाला भरून काढायची आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करून मुंबईत एक ताकदीची जाणीव करून द्यायची आहे' असा निर्धार पटेलांनी यावेळी व्यक्त केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्वच जागांसाठी एका बूथवर चार-चार खासदार लावले होते. परंतु त्यांना दिल्लीच्या लोकांचे प्रश्न माहीत नव्हते, म्हणून त्यांना यश आले नाही, असेही ते म्हणाले. २०२२ मधील महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५० हून अधिक नगरसेवक सभागृहात दिसले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.