मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना खबरदारी म्हणून डाॅक्टरांचे मोठे शस्त्र म्हणजे पीपीई किट. कोरोना काळात सुरूवातीला पीपीई किटचा मोठा तुटवडा होता. त्यांनतर देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात पीपीई किटचे उत्पादन सुरू झाले. मुंबईतील कोरोना व्हाॅटस्पाॅट पैकी एक धारावीमध्येही पीपीई किटचे उत्पादन केले जात आहे. याठिकाणी पीपीई किटसह फेस शिल्ड, मास्कचीही निर्मिती केली जात आहे.
कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढू लागल्याने सरकारने देशभरात लाॅकडाऊन लागू केला. उद्योग, व्यवसाय बंद पडले. धारावीतील लघु उद्योगही बंद होते. याठिकाणी शाळेच्या बॅग्स, गारमेंटचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने डॉक्टरांच्या व पोलिसांच्या सहकाऱ्यांनी येथील लघु उद्योजकांनी पीपीई किट, मास्क, फेस शिल्ड निर्मितीला सुरुवात केली. आज राज्यातील सर्वात अधिक पीपीई कीटचे उत्पादन याठिकाणी होते.
लॉकडाऊनच्या पहिल्या पंधरा दिवसातच धारावीतील बॅग आणि गारमेंट व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांनी मजुरांना घेऊन पीपीई कीट, मास्क आणि फेस शिल्ड बनवायला सुरुवात केली. यातून बाहेरील कामगारांना लाॅकडाऊनदरम्यान रोजगार मिळाला. दररोज 7 ते 8 हजार पीपीई किट आणि मास्क याठिकाणी बनवले जातात. पंधरा ते वीस लघुउद्योजक याठिकाणी हे साहित्य बनवतात. आतपर्यंत लाखो वस्तू आम्ही बनवून विकल्या असल्याचे येथील व्यावसायिक राजेश केवार यांनी सांगितले.
धारवीत तयार झालेले साहित्य राज्याभरात विक्री होते. किट बनवताना वेगवेगळ्या दर्जाचे बनवू त्याच्या किंमतीही त्याप्रमाणे ठरवल्या जातात. 135 ते 250 रुपयापर्यंत येथील तयार पीपीई किट विकला जातो. तर मास्क एक रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत किमतीचा बनविला जातो. फेस शिल्ड 35 ते 70 रुपयेपर्यंतचा बनविला जातो.