मुंबई - कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या कोट्यवधी मुंबईकरांना महाविकास आघाडी सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकरांना दरवर्षी द्याव्या लागणाऱ्या घरपट्टी आकारणीच्या दरात पुढील वर्षांत कोणतीही वाढ केली जाणार नाही. दोन वर्षांसाठी घरपट्टीचे दर आहे तेच ठेवले जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबईमध्ये दरवर्षी घरपट्टीच्या दरामध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ केली जाते. परंतु कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट लक्षात घेता घरपट्टीत कोणतीही वाढ न करण्याचा सरकारचा मानस आहे.
नक्षलग्रस्त भागातील अधिकाऱ्यांनाही मिळणार दिलासा -
आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांसाठी मागील बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्याच्या इतिवृत्तालाही मंजुरी देण्यात येणार आहे. पिकविमा, कोरोना आणि त्यासंबधीत इतर बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना अधिकच्या सवलती देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
हेही वाचा - माजी सैनिकांना दिलासा; घरपट्टी मालमत्ता कर माफीसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने माजी सैनिक सन्मान योजना