मुंबई - मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.
पश्चिम किनारपट्टीवर मान्सून वेगाने विकसित होत आहे. त्याचा परिणाम उत्तर कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर येथे पहायला मिळत आहे. घाट विभागातही पुढील 24 तासात अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
दरम्यान, आज पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. मुंबईत गेल्या सहा तासात 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढू शकतो, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील हवामानाचा अंदाज
5 ऑगस्ट: कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
6 ऑगस्ट: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
7 ऑगस्ट: दक्षिण कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
8 ऑगस्टः कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.