मुंबई - विधिमंडळाचा आज तिसरा दिवस असून दोन्ही सभागृहात अर्थसंकल्प सादर होईल. हा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी सर्वांचेच याकडे लक्ष असणार आहे. याबद्दल ईटिव्हीने घेतलेला हा आढावा ...
केंद्राच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्यातही शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन अर्थसंकल्प सादर केला जाईल. यात शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफीच्या योजनेबाबतही काही बदल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण राज्य सरकारने कर्जमाफी करून एवढे दिवस झालेले असतानाही त्याचा लाभ शेतकऱ्यांना न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.
कार्यक्रम पत्रिकेनुसार आज यावर्षीच्या भारतरत्न मिळालेल्या सन्मानार्थींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जाईल आणि त्यावरच चर्चा होईल. त्यानंतर काही विधेयके चर्चेला येतील. दुपारी २ वाजता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत, तर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. हे आजच्या दिवसभराच्या कामाचे स्वरुप असेल. अर्थसंकल्प सादरीकरणानंतर सभागृहाचे काम तहकूब होईल आणि नंतर सादर अर्थसंकल्पातील तरतुदींवर चर्चा होईल.