मुंबई - राज्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांना बेड्सची कमतरता पडत आहे. ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे रुग्णही रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात भरती होत असल्याने गरजू रुग्णांना खाटा मिळत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणतीही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला खासगी रुग्णालयाने भरती करुन घेऊ नये, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले.
मृत्यू लपवले या आरोपावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्य सरकारचा हेतू स्वच्छ आहे. काहीही लपवायचे नाही असे त्यांनी सांगितलं. ज्या पॉझिटिव्ह रुग्णात कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना खासगी रुग्णालयांनी दाखल करून घेऊ नये, अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. कोरोनाचा थेट रिपोर्ट रुग्णांना दिला तर कोणतीही लक्षणे नसलेले लोक तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात जाऊन दाखल होत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन आणि आयसीयूची गरज असणाऱ्या रुग्णांना जागा मिळत नाहीत. खासगी रुग्णालये लक्षणे नसलेल्या लोकांना दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. ज्या रुग्णांना खरंच बेडची गरज आहे, त्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे टोप यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेचे विशेष अधिकारी नेमण्यात आले असल्याचेही टोपे म्हणाले.
दोन औषधांची मागणी होतेय, त्याबाबत आज पंतप्रधानांकडे आम्ही आग्रहाची मागणी करणार आहोत. दोन औषधे केंद्राने तत्काळ उपलब्ध करून द्यावी, त्याची किंमतही कमी ठेवावी, अशी आमची मागणी असल्याचे टोपे म्हणाले. 500 व्हेंटिलेटरची मागणीही आम्ही पंतप्रधानांकडे करणार आहोत. तसेच मुंबईत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही अशी तक्रार आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये 5 ते 10 रुग्णवाहिका आम्ही ठेवत आहोत. 1916 किंवा वॉर्ड ऑफिसच्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिकेची मागणी करावी. खासगी रुग्णवाहिकेची मागणी करू नये असे टोपे म्हणाले.
कोरोना चाचणीचे दर आम्ही दोन दिवसांपूर्वी निश्चित केले आहेत. 2 हजार 200 आणि 2 हजार 800 दर केले आहेत. पण जे थेट लॅबमध्ये जातात त्यासाठी 2 हजार 800 रुपये आकारले जातात. मुंबई महापालिका आयुक्तांनी एक निर्णय घेतलाय. सर्व कोरोनाचे रिपोर्ट एका ठिकाणी येतील, नंतर ते वॉर्ड निहाय पाठवले जातील. रेमडेसेवीर आणि टोसीलोझुबामिन या दोन इंजेक्शनची मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचेही टोपे म्हणाले. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ही इंजेक्शन्स फायदेशीर असल्याचे ते म्हणाले.