मुंबई - गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ४ फुटी व घरगुती २ फुटी ऊंचीच्या श्री मूर्तीची प्रतिष्ठापणा करावी तसेच विविध नियम, सूचना सरकारने दिले आहेत. त्यामुळे वर्षा अगोदरच तयार केलेल्या मोठ्या मूर्तीचे तसेच मूर्तींची मागणी कमी असल्याने राज्यभरासह मुंबईतील मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले आहे.
गणेश मूर्ती शिल्लक राहिल्याने मूर्तिकारांचे मोठे नुकसान... आज बाप्पाची प्राणप्रतिष्ठा सर्वत्र करण्यात येत आहे. मात्र कोरोनामुळे मूर्तीची विक्री कमी प्रमाणात झाली असल्याने मूर्तिकारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मूर्ती कलाकेंद्रात मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान यंदा झाले आहे, असे मुंबईतील मूर्तीकार सांगत आहेत. सरकारने शेतकऱ्यांप्रमाणे मूर्तिकारांनाही आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मूर्तिकारांनी केली आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांना मोठमोठ्या मूर्ती लागतात. यासाठी मूर्तिकार चार ते पाच महिने आधीच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागतात. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून राज्य सरकारने सर्व सणांसोबत गणेशोत्सवही साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सरकारने नियमावलीच बनवली आहे. त्यात सर्वांत मोठी अट म्हणजे सार्वजनिक मंडळांनी चार फूट व घरगुती दोन फूट गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशामुळे श्री मूर्तिकारांसमोर मोठं संकट आले. मागील वर्षीच्या तुलनेत ज्या केंद्रात चौदाशे गणपती विक्री होत होती, त्या ठिकाणी यंदा सातशे मूर्ती होत्या. त्यातल्या साडे पाचशे मूर्तीच विकल्या गेल्या, असे मूर्तिकार पांचाळ यांनी सांगितले. एकंदरीत कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी गणेश मूर्ती केंद्रामध्ये मूर्ती शिल्लक राहिल्याने मूर्तिकारांवर संकट ओढवले आहे. शिल्लक मूर्तींचे काय करावं, हे त्यांना कळेना झालं आहे.
हेही वाचा - यंदा लालबाग मंडळाकडून आरोग्योत्सव साजरा...
हेही वाचा - 'वर्षा'वर कुटुंबीयांसमवेत मुख्यमंत्र्यांनी केली श्री गणेशाची प्रतिष्ठापना