मुंबई - शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेगावच्या आरे कॉलनीत सध्या काय चाललेय याचा आढावा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी घेतला. लॉकडाऊनमुळे प्रदूषणाला आळा बसला असून वृक्षतोड झोपडपट्टीसाठी वृक्षतोडीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचे समोर आले. याबाबत स्थानिक आदिवासी नागरीक व सेव आरेतील सक्रिय कार्यकर्ते प्रकाश भोईर यांच्याशी ईटीव्ही भारतने बातचीत केली आहे.
लॉकडाऊन काळात एक गोष्ट घडली ती म्हणजे आरे कॉलनीतून मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक थांबली. यामुळे येथील प्रदूषण कमी झाल्याने उरलेल्या झाडांनी व पक्षी प्राण्यांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे वनसंपदा व प्राणी यांच्यासाठी वर्षातून किमान एकदा असे लॉकडाऊन जाहीर करावे, अशी मागणी स्थानिक आदिवासी प्रकाश भोईर यांनी केली.
मुंबई मेट्रो 3 च्या आरेतील कारशेड व त्यासाठी रातोरात तोडण्यात आलेली 2 हजार झाडे आणि त्यांना वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी सुरू केलेल सेव आरे आंदोलन यामुळे आरे कॉलनी व तेथील वृक्षसंपदा याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
या लॉकडाऊन काळातही आरेतील वृक्षांवर काही समाजकंटकांची वक्रदृष्टी पडल्याचे समोर आले. वृक्षतोड करून झोपडपट्टी उभारण्याचे काम सुरू असल्याची चाहूल लागताच स्थानिक जागरूक नागरिकांनी तो डाव हाणून पाडला.