मुंबई - भाजपामध्ये मागील 40 वर्षांहून अधिककाळ राहून पक्ष वाढीसाठी योगदान देणारे भाजपाचे नेते एकनाथ खडसे हे उद्या, 23 ऑक्टोबर रोजी भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर खडसे यांचे पुनर्वसन, हे मोठे मंत्रिपद देऊन केले जाणार असल्याने राज्यातील राजकीय समिकरणेच बदलली जाणार आहेत. यामुळेच महाविकास आघाडीतील विद्यमान मंत्रिमंडळातही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यासाठीच मागील दोन दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे-पुढे ढकलण्यात आली आहे.
या बैठकीतच मंत्रिमंडळातील नवीन बदल आणि त्यासाठीचा काही विषय चर्चिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील 15हून अधिक मतदारसंघात खडसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे या क्षेत्रात भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकीत सुमारे 15 विधानसभा जागांवर फटका बसू शकतो. तसेच राज्यातील ओबीसी नेते म्हणून ते तगडी भूमिका बजावू शकतात. यामुळे भाजपाला फटका बसू शकतो.
शिवाय ते उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या वर्चस्वाला मोठे आव्हान देऊन शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. दुसरीकडे खडसे यांचे पुनर्वसन करताना राष्ट्रवादीतील काही नेत्यांना नारळ देऊन त्यांचे मंत्रिपद खडसे यांना दिले जाणार आहे. यामध्ये सर्वात जास्त गृहनिर्माण आणि कामगार विभागाचे मंत्रिपद मिळण्याची अधिक शक्यता आहे. तर दुसरीकडे खडसे यांनी आपल्याला कृषीमंत्रीपद मिळावे, अशी मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कृषीमंत्री पद देण्याचा विषय समोर आला तर हे खाते शिवसेनेकडे असल्याने राष्ट्रवादीला त्याबदल्यात गृहनिर्माण खाते द्यावे लागणार असून त्यासाठीची राष्ट्रवादीने तयारीही दर्शवली असल्याचे सांगण्यात येते.
खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे विद्यमान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेत, त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आजारीपणाच्या कारणामुळे दिलीप वळसे पाटील यांनाही नारळ दिला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे.