मुंबई - कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मुंबईत दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. राज्यात टाळेबंदी 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून तोंडाला मास्क लावणे हे आवश्यक असून तसा शासनाचा नियम सुद्धा आहे. तरीही बरेच जण हे रस्त्यावर जाताना तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या 4 हजार 709 जणांवर कारवाई केली आहे.
20 मार्च ते 19 जुलै दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी टाळेबंदीचे उल्लंघण करणाऱ्याच्या 16 हजार 915 प्रकरणात तब्बल 37 हजार 829 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 5 हजार 535 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 14 हजार 173 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर 18 हजार 121 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.
टाळेबंदीच्या काळात कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 1 हजार 639 गुन्हे दाखल करण्यात आले असून मध्य मुंबईत 2 हजार 523 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . तर पूर्व मुंबई तब्बल 2 हजार 807 गुन्हे दाखल झाले आहेत. पश्चिम मुंबईत 2 हजार 700 तर उत्तर मुंबईत 7 हजार 264 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल, पानटपरी उघडी ठेवण्यासंदर्भात, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.