मुंबई Uddhav Thackeray Matoshree : 'उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार', असा फोन अज्ञात व्यक्तीनं पोलिसांना केलाय. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ घराबाहेर घातपात करणार आहेत, अशी माहिती देणारा फोन अज्ञात व्यक्तीनं पोलीस नियंत्रण कक्षाला केला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
अज्ञात कॉलरनं दिली धमकी : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड करणार असल्याच्या आशयाचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला आणि पोलीस दलात खळबळ उडाली. फोन करणाऱ्या व्यक्तीनं मुंबई-गुजरात ट्रेननं प्रवास करणाऱ्या ४ ते ५ व्यक्तींचे संभाषण ऐकून तशी माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. हे तरुण उर्दूतून संभाषण करत असल्याची माहिती देखील अज्ञात कॉलरनं पोलिसांना दिली. हे तरुण मोहम्मद अली रोड येथे रुम रेंटवर घेणार असल्याचंही नियंत्रण कक्षाला सांगितलं. ही माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षातून मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली असून, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईत भाड्यानं घर घेणार : नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं संशयितांचे संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावा केलाय. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ४ ते ५ जण प्रवास करत होते आणि 'मातोश्री'बाहेर हल्ला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संशयितांचे संभाषण ऐकून अज्ञात व्यक्तीनं तत्काळ महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला, असा दावा त्यानं केला. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण उर्दू भाषेत बोलत होते. ते मुंबईतील भायखळा परिसरातील मोहम्मद अली रोडवर भाड्यानं खोली घेऊ, असं बोलत होते, अशी माहिती या अज्ञात कॉलरन्ं पोलिसांना दिली.
संजय राऊतांचा हल्लाबोल : या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. दुसरीकडं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. राऊत म्हणाले, "मला माहिती आहे की फोन करणारे कोण होते... विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिली होती. त्यांनी मुस्लिमांची नावे घेतली आणि राम मंदिर उडवण्याची धमकी दिली. या देशात लोकसभा जिंकण्याची भाजपाची तयारी आहे किंवा निवडणुकीपूर्वी धार्मिक फूट पाडून निवडणूक लढवा, हे सर्व भाजपाचं षडयंत्र आहे.'
राज्यातील सरकार संशयास्पद : पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले, 'ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ती महाराष्ट्र सरकारची नाही कारण इथे साशंक सरकार आहे. ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा काढण्यात आली, तशीच शिवसेना नेत्यांची सुरक्षाही काढण्यात आली आहे. त्यामुळं भविष्यात काही घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या गृह विभागाची आहे.
हेही वाचा :