मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. या विषाणूचा प्रसार रोखता यावा, यासाठी सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती केली आहे. मास्क घातले नाही तर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतरही काही लोक मास्क न घालता फिरत असल्याने अशा लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने मालाड आणि वांद्रे येथे दोघांवर कारवाई करत प्रत्येकी हजार रूपायांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालिका आयुक्तांनी मुंबईत मास्क घालणे बंधनकारक केले. शुक्रवारपासून या निर्णयाच्या अंमलबजावणी सुरुवात झाली आहे. आजही अनेकजण विनामास्क फिरताना दिसतात. वारंवार सांगूनही अनेकजण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी पालिकेच्या वांद्रे पूर्व आणि मालाड उत्तर भागातील प्रत्येकी एका व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली. प्रत्येककडून एक हजार याप्रमाणे दोन हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या कालावधीत नागरिकांनी काय करावे, काय करू नये याबाबत वारंवार आवाहन केले जाते. खोकताना शिंकताना रूमालाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मास्कची सक्ती करण्यात आली आहे. मात्र बेजबाबदार नागरिक याचे उल्लंघन करतात. त्यामुळे संबंधितांना शिस्त लावण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. यापुढे ती अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.