मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चोवीस तास मोठ्या संख्येने प्रवासी गावी जाण्यासाठी येथे वेळेच्या आत येवून विश्रांतीगृहात विश्रांती घेतात. त्याचाच फायदा एक दुकली घेत होती. प्रवाशांना आपलंसे करून मैत्री झाली, की मलई असलेले बिस्किट खात सोबतच्या प्रवाशांना देत असत. आणि प्रवाशाला नशा झालेली दिसली की त्यांचे साहित्य लांबवतात. अशीच घटना २ मार्चला एका प्रवाशा सोबत घडली होती. त्याच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी विश्रांती सभागृहात पाळत ठेवून नुकतीच मामा-भाच्याला अटक केली.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २ मार्चला एका व्यक्तीने रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, की मला दोघा व्यक्तींनी बिस्कीट खाऊ घालून गुंगी आल्यानंतर माझे साहित्य लांबले. रेल्वे सुरक्षा बलाने सभागृहातील सीसीटीव्ही कॅमेरा आणि पाळत ठेवून आरोपीचा शोध घेत होते. ८ मार्चला रेल्वे सुरक्षा दलाच्या निलेश सोमवंशी व सचिन गायसमुद्रे जवानांना दोन संशयित व्यक्ती सभागृहात फेऱ्या मारताना दिसल्या. पोलिसांनी त्याना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपी अरविंद मानसिंगार प्रसाद (मामा) व संजय महंत पटेल (भाचा) राहणार पनवेल (मूळ रहिवाशी बिहार चंपारण्य) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. १२ पेक्षा अधिक लोकांना लुटल्याचेही त्यांनी कबूल केले.