मुंबई - पोलीस असल्याची बतावणी करत एका वाहन चालकास लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. डिसेंबर महिन्यात या टोळीने विक्रोळीत गाडीतील विदेशी चलन आणि साहित्य असा एकूण 9 लाख रुपये किमतीचा ऐवज लुटला होता. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. सनी चरण प्रमोद डे (वय 34), राकेश दौलतराम मोहनानी (वय 29), यश हरीश तिवारी (वय 23), राहुल श्रीकांत शुक्ला (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 डिसेंबर 2019 ला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास निर्मल कुकरेजा हे आपल्या कारने अंबरनाथ येथून मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या पुलाजवळ अचानक त्यांच्या गाडीसमोर 4 अनोळखी लोक आले. त्यांनी गाडी अडवून पोलीस असल्याचे सांगत गाडीची झडती घेतली आणि गाडीतील विदेशी चलन आणि इतर खाद्यपदार्थ घेऊन पूर्व महामार्गाने ठाणेच्या दिशेने पळून गेले.
निर्मल कुकरेजा यांनी या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करत अधिक तपास केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.