नवी दिल्ली - महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेगासेस प्रकरणावरुन पंतप्रधानानांवर निशाणा साधला. पेगासस प्रकरण खरे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
कोरोना परिस्थितीत हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, महागाई नियंत्रण, बेरोजगारी, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या विषयांमध्ये केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे ते आणखी या प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष हटवत आहेत. मात्र, पेगासस प्रकरणात सत्य असेल, तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पेगासस फोन प्रकरण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणी आता ईस्रायलमध्ये गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. तसे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप झाल्याचा दावा केला होता. पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप करुन हेरगिरी केल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही हाच धागा पकडत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे प्रकरण २०१७-१८ मधील असल्याचे ते म्हणाले.
नेत्यांची हेरगिरी गंभीर मुद्दा
जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगासस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगासस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९ मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था ‘एनएसओ’ ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९ च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता. कॉंग्रेसने संसदीय अधिवेशनात यावरुन रान उठविले आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन २०१७-१८ मध्ये टॅप झाला होता, असे म्हटले आहे. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येत असून ते गंभीर आहे. देशातील महत्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडे जाऊ शकते, असे थोरात यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातही फोन टॅपिंगचा मुद्दा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात उचलून धरला होता.
हेही वाचा - आजपासून लाल किल्ला पर्यटकांसाठी 15 ऑगस्टपर्यंत बंद