मुंबई - देशावर आलेल्या कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणपतीची प्रतिष्ठापणा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाने लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधत आरोग्योत्सव व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन केले आहे. अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित कोरोनायोद्ध्यासोबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. कोरोनाशी यशस्वीरित्या झुंज देऊन मात केलेल्या नागरिकांनी जनतेला घाबरू नका, लढा आणि कोरोनावर मात कशी करता येईल याबाबत संदेश दिला.
३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आरोग्योत्सव होणार असून त्याची रूपरेषा शनिवारी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून जाहीर करण्यात आली. या उत्सवात रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन केले आहे. केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबीर होत असून ३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळात प्लाझ्मादान करण्यासाठी नोंदणी करता येणार आहे.
'लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने यंदा मूर्तींची प्रतिष्ठापणा न करता ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मादान उपक्रम राबवला जाणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाने या उपक्रमांद्वारे अतिशय चांगला आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. त्याबद्दल मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे शरद पवार यांनी अभिनंदन केले.