मुंबई - येथे एका व्यक्तिने हेल्थ क्लबमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच तिची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केली होती. या आरोपीली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बंगळुरू येथून फूड डिलिव्हरी बॉयचा वेश घेऊन अटक केली.
तक्रारदार पीडित महिला एका हेल्थ क्लबमध्ये काम करत होती. यावेळी सोशल माध्यमांवर मोहम्मद शौकत नावाच्या युवकाशी तिची ओळख झाली. सोशल मीडियावर एकमेकांशी संपर्क साधल्यानंतर या दोघांनी एकमेकांचा मोबाईल क्रमांक शेअर करून बोलण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर शौकत मोहम्मद याने सदर पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले होते. इतकेच नाही तर पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांशी ओळख वाढवून आम्ही लवकरच लग्न करणार असल्याचे आश्वासन सुद्धा दिले होते.
त्यानंतर आरोपीने पीडित महिलेसोबत शरीरसंबंध बनवले. मात्र, त्यानंतर पीडितेने आरोपीला लग्नाबद्दल विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली होती. लग्न करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा नसल्याचे कारण सांगत त्याने पीडितेकडून पाच लाख रुपयेसुद्धा घेतले होते. यानंतर अचानक त्याने पीडित महिलेशी संपर्क तोडून टाकला.
फसवणूक झाल्याचा संशय आल्यानंतर पीडितेने यासंदर्भात जेजे मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत सदर आरोपीचा शोध घेतला असता तो बंगळुरू येथे असल्याचे तपासादरम्यान कळले.
बंगळुरुमध्ये आरोपी एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका महिलेसोबत राहत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. मात्र, तो राहत असलेल्या इमारतीमध्ये त्याच्या पत्त्यावर वारंवार ऑनलाइन फूड डिलिव्हरी दिली जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांनी फूड डिलिव्हरी बॉयचे वेषांतर करून त्याच्या घरी छापा टाकत त्याला अटक केली.