मुंबई - सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीतील फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून छायाचित्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील कुलाबा येथील शारी अकादमीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. 'स्ट्रीट कहानी' या थीमवर हे छायाचित्र काढण्यात आले होते.
गेल्या १७ वर्षांपासून निस्वार्थ हेतूने काम करणारी ‘सलाम बॉम्बे’ फाऊंडेशन ही भारतातील टॉप 10 संस्था पैकी एक नामांकीत संस्था आहे. ही संस्था मनपा शाळांमध्ये तंबाखू नियंत्रणासंबंधीत जनजागृती निर्माण करण्याचे काम करत आहे. बुधवारी आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि दीपप्रज्वलन सकाळी 11 वाजता गिरीश मिस्त्री आणि हृदगंधा मिस्त्री यांनी केले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात भेट देऊन पसंती दर्शवली. फोटोग्राफीच्या मुलांनी दादर फुल मार्केट, धोबी घाट, वाळकेश्वर, कुंभारवाडा, भायखळा भाजी बाजार अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन हे फोटो काढले आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांना एक मंच उपलब्ध करून देणे हा सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीचा मुख्य हेतू आहे. त्यामुळेच हे प्रदर्शन देखील भरवले आहे, असे मीडिया अकादमीकडून सांगण्यात आले.
सलाम बॉम्बे मीडिया अकादमीअंतर्गत इयत्ता ७, ८, ९ वी च्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे मीडियाचे प्रशिक्षण दिले जाते. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शिस्त रुजवणे, संवाद कौशल्य विकसित करणे आदी कार्य केले जाते. त्यातच फोटोग्राफी हा विषय देखील शिकवला जातो. त्यामधूनच अकादमी ऑफ प्रोफेशनल फोटोग्राफी या संस्थेद्वारे मुलांना फोटोग्राफीचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर मुलांच्या उत्तम छायाचित्रांना तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. हे प्रदर्शन २२ आणि २३ ऑगस्टला सुरू राहणार आहे. या प्रदर्शनास मुंबईकर मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.