मुंबई - मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन मुंबई पोलिसांना आला होता. हा फोन दुपारी 12.45 च्या सुमारास आला. धमकीचा फोन आल्याने सुरक्षा व्यवस्था चोख तैनात करण्यात आली. मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये हा फोन आला. यानंतर मंत्रालयाच्या बाहेरील सगळ्या गेटवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, अडीच तासाच्या तपाणीनंतर मंत्रालय परिसरात कोणातीही आक्षेपार्य वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, हा धमकीचा फोन नागपूरमधील एका व्यक्तीने केला असल्याची माहिती पुढे आली आहे. सागर काशिनाथ मांढरे असे या व्यक्तीचे नाव आहे.
'मंत्रालय' ही संवेदनशील इमारत -
राज्याचा गाड्या ज्या इमारतीमधून हाकला जातो. ती इमारत म्हणजे मंत्रालय. अनेक शासकीय कार्यालये येथेच आहेत. तसेच प्रत्येक महत्त्वाच्या विभागाचे सचिव या मंत्रालयात कार्यरत आहेत. याच मंत्रालयात मंत्र्यांची दालने देखील आहेत. तसेच मुख्य सचिवांची दालनेदेखील येथेच आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या मंत्रालयात अनेक जण आपली गाऱ्हाणे घेऊन येतात. त्यांच्या तक्रारीचे निवारण याच मंत्रालयातून होत असते. अनेकदा कॅबिनेटची बैठक मंत्रालयातच होत असते. तसेच मंत्रालयाला लागूनच हाकेच्या अंतरावर मंत्र्यांचे शासकीय बंगलेदेखील आहेत.
मंत्रालयाची इमारत कधी-कधी चर्चेत आली?
जून 2012 मध्ये मंत्रालयाला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये अनेक महत्त्वाचे दस्ताऐवज भस्मसात झाले होते. तसेच आगीत जीवितहानीचे वृत्त देखील होते. जानेवारी 2018 मध्ये धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच विष प्राशन केले होते. यामुळे धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला होता.
कोण आहे सागर मांढरे -
सागर मांढरे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकडधोकडा या गावाचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सागर गेले अनेक दिवस वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या खाणी लगतच्या जमिनीचा सातबारा तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त या सर्व पातळ्यांवर मागत आहे. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनुसार ती जमीन अस्तित्वातच नसल्यामुळे त्याचा सातबारा त्याच्या नावावर देता येत नाही. याच प्रकरणी सागरने मंत्रालयातही तक्रार केली आहे आणि त्याच तक्रारीसंदर्भात तो यापूर्वी मंत्रालयात ही जाऊन आला आहे. मात्र, त्याच्या मागणीनुसार त्या जमिनीचा सातबारा त्याच्या नावावर होत नसल्यामुळे तो अशाच पद्धतीने विविध कार्यालयांमध्ये फोन करत राहतो. यापूर्वीही त्याने काही सरकारी कार्यालयांमध्ये असे धमकीचे फोन केल्याची पोलिसांची माहिती आहे.
हेही वाचा- तोतया पोलीस बनून लुटणाऱ्याला अटक, रतन टाटांशी संबंध असल्याच्या मारत होता थापा