मुंबई- कोरोनाबाधित व्यक्तींची नावे घोषित करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका सोलापूर मधील सामाजिक कार्यकर्ते महेश गाडेकर यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए. ए. सय्यद व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.
या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोरोना हा फक्त रोग नसून ही महामारी आहे. कोरोनाबाधित असलेल्या एखाद्या व्यक्तीला तो पंधरा दिवसात किती जणांच्या संपर्कात आला, याची माहिती विचारली जाते. त्यावरून संपर्कात आलेल्या व्यक्तीला सुद्धा 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येते. बाधित व्यक्तीने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती दिली का ?, असा प्रश्न पडतो, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले.
जेंव्हा व्यक्तीला कळते की तो कोरोनाबाधित झालेला आहे. त्या वेळेस तो मानसिकदृष्ट्या पुर्णपणे खचून गेलेला असतो. त्या व्यक्तीला पहिला प्रश्न पडतो माझ्या घरातील लोकांना कोरोना होईल का? मी नीट होईल का? माझ्यावर उपचार होतील का ? माझ्या मुला बाळांच कसे होणार , असे एक नाही तर हजारो प्रश्न त्या व्यक्तीला पडतात, अशा वेळी मानसिक तणावाखाली असलेल्या रुग्णांकडून प्रशासनाला योग्य माहिती मिळेलच असे नाही, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
यावर उपाय म्हणून राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाबाधित आढळणाऱ्या रुग्णांचा नावासह तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर नमूद करावेत जेणेकरून बाधित असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना याची माहिती आपोआप मिळेल. त्यानंतर ते स्वतः संबंधित विभागाला या बद्दल माहिती देतील, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केलाय. यावर राज्य शासनाला उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत उच्च न्यायालयाने दिली असून 27 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.