मुंबई - कोरेना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. गर्दी करू नये असे राज्य सरकारच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. दाटीवाटीचे परिसर असलेल्या पूर्व उपनगरात देखील काही रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी होणारी गर्दी कमी होताना दिसत नाही.
भांडूप येथील गाढवनाका परिसरात भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्स नियम या ठिकाणी धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे. वेळोवेळी प्रशासनाकडून आवाहन करून देखील भांडुपच्या या मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यासोबतच नागरिकांकडून सोशल डिस्टन्स पाळला जात नाही आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विभागवार करण्यासाठी ह्या परिसरांमध्ये प्रशासनाकडून उपाययोजना करणं गरजेचं होते. मात्र, तसे होत नसल्यामुळे नागरिक मुख्य बाजारपेठांमध्ये येऊनच खरेदी करताना दिसून येत आहेत. एकीकडे मुंबईमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे मात्र अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.