मुंबई - नागरिकत्व सुधारणा विधेयकाला देशासह राज्यात जोरदार विरोध होताना दिसत आहे. आज मुंबईतही अनेक ठिकाणी याविरोधी आंदोलने करण्यात आली. डाव्या-पुरोगामी-विद्यार्थी संघटनांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती मैदानात सभा घेण्यात आली.
ऑगस्ट क्रांती मैदानात आज मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मैदान पूर्णपणे गर्दीने भरून गेले होते. हातात तिरंगा आणि विविध लक्षवेधी फलक घेऊन नागरिक या ठिकाणी आले होते. मैदानाच्या बाहेर प्रचंड गर्दी जमली होती. महाराष्ट्र वगळता अनेक राज्यात या कायद्याचा विरोध करताना हिंसाचार झाला होता. मात्र, मुंबईत आज झालेल्या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदान येथे अनेक संघटना व विद्यार्थी, विचारवंत, कलावंत एकत्र आले होते. हे विधेयक घटनेविरुद्ध असून त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी केली गेली. मोदी सरकारविरोधात घोषणा देत हजारो विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.