मुंबई - मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर मुंबईत कायम आहे. आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे कुर्ला पश्चिममधील मिठी नदीजवळ असलेल्या क्रांती नगर परिसरातील तेराशे लोकांना स्थलांतरित करण्यात आले असून जवळच्या पालिका शाळेत या रहिवाशांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेच्या आपात्कालीन पथकासह एनडीआरएफचे पथक याठिकाणी दाखल झाले असून परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
२६ जुलै, २००५ मध्ये मुंबईत जलप्रलय आला होता. त्यावेळी मिठी नदीमुळे मुंबईत हाहाकार उडाला होता. त्यानंतर मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचे काम राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने हाती घेतले होते. त्यानंतर आजही मुंबईत मोठा पाऊस झाल्यास मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडत असते. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यावर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागते.
आज मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने क्रांती नगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे पालिकेने इथल्या रहिवाशांना जवळच्या बजारवाड पालिका शाळेत स्थलांतरीत केले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर अनेक घरांतही पाणी शिरले आहे. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने येथल्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करून शाळा, महाविद्यालये, समाजमंदिरांमध्ये राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे.
मुंबईत पावसाचा जोर कायम असून पुढे देखील मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यातच मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पालिकेसह अग्निशमन दल, पोलीस प्रशासन दाखल झाला असून नेव्ही कडून मिठी नदीत बोटीच्या माध्यमातून गस्त सुरू करण्यात आली आहे.