मुंबई - राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटत नसल्याने ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये मांडले जातात. यानंतर ते तत्काळ मार्गी लागले जातात. यामुळे त्यांच्या प्रश्नाचे निराकरण झाल्यानंतर जनता इथून जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसते आणि हेच समाधान जनता दरबारचे यश असल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅलार्ड पियर येथील असलेल्या मुख्य कार्यालयात गुरुवारी मुंडे यांचा जनता दरबार होता. यामध्ये राज्यभरातील विद्यार्थ्यां सोबतच अनेक नागरिकांनी रांगा लावून विविध प्रश्न आणि त्या संदर्भातील निवेदने मुंडे यांच्याकडे दिली. अनेक निवेदनावर काही मिनिटाच्या अंतरातच मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून ते मार्गीही लावले तर अनेक प्रश्न हे शासकीय स्तरावर सोडविण्यासाठी त्याची नोंद घेऊन ते पुढील कार्यवाहीसाठी तातडीने तयार करून संबंधित नागरिकांना त्यांची माहिती देण्यात आली.
यासंदर्भात मुंडे म्हणाले की, राज्यभरातून सर्वसामान्य लोक आपले प्रश्न घेऊन येथे येत आहेत. त्यांचे प्रश्न इथूनच मागे लागत असल्याने त्यांना एक समाधान मिळत आहे. नागरिकांच्या प्रश्नांचे स्थानिक पातळीवर समाधान होऊ शकत नाही. अथवा ते मार्गी लागू शकत नाहीत, अशी सर्व कामे जनता दरबारमधून ते मार्गी लावले जात आहेत. त्यामुळे इथूनच फोन करून त्यांचा न्यायनिवाडा आम्ही करत असतो. या कामासाठी अनेकदा पत्र देणे, प्रस्ताव मागविणे अशा गोष्टी केल्या जात आहेत. इथे आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसते असेही मुंडे म्हणाले.
आपल्या जनता दरबार मध्ये राज्यभरातील मागासवर्गीय घटकातील सर्वात जास्त प्रश्न नागरिक घेऊन येतात. त्यामध्ये वसतीगृहापासून ते दिव्यांग व्यक्ती असतील, आश्रमशाळा, मागासवर्गीयांचे विविध प्रश्न, शिष्यवृत्तीसोबत विद्यार्थ्यांच्या इतर अनेक प्रश्नांचे निवेदने आपल्याकडे येत असतात आणि त्याचे निराकरणही आपण लगेच करतो, असेही मुंडे म्हणाले.