मुंबई : मोदींची डिग्री नाहीतर करिश्मा बघून लोकांनी मते दिली असे मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. २०१४ ला लोकांनी नरेंद्र मोदींना डिग्री बघून दिलेले नाही. देशात स्वतः चा करिष्मा त्यांनी निर्माण केला. जो काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत भाजपचा कधीही नव्हता. यामागे सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांचे आहे. डीग्रीवर काय आहे, आतापर्यंत सुरुवातीपासून देशाचे पंतप्रधान झाले, अनेक मुख्यमंत्री झाले. आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करून निवडून येणाऱ्याला महत्त्व आहे. बहुमत असेल तो प्रमुख होतो.
शिक्षण असो किंवा वैद्यकीय क्षेत्र यात पदवी झाल्याशिवाय काम करता येत नाही, असे राजकारणात कधीही झालेले नाही. त्यामुळे ते आज ९ वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत आणि आता डिग्रीचे काढले जाते, हा महत्त्वाचा प्रश्न नसल्याचे पवार म्हणाले. सध्या महागाई आणि बेरोजगारीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. त्याबद्दल बोलायचे नाही, चर्चा करायची नाही. नोकरी कधी मिळणार या आशेवर तरुण आहेत. ७५ हजाराची वेगवेगळ्या खात्यात भरती होणार होती. त्याचे काय झाले? शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगार, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. हे महत्वाचे प्रश्न सोडून डिग्रीला फार महत्व देणे चुकीचे ठरेल, असेही अजित पवार म्हणाले.
वाढत्या महागाईमुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई, बेरोजगारी कमी करण्यास सरकार अपयशी ठरत आहे. उद्योगधंदे आणण्यासाठी जे पोषक वातावरण तयार केले नाही. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांवर, मुलींवर भगिनींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात काय चालले आहे. ही मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी सरकारला विचारला आहे.
सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही : राज्यात सावरकर यात्रा काढण्याचे थोतांड सुरु आहे. परंतु केंद्रात, राज्यात सत्ता असताना सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही. कोणत्या मुहुर्ताची वाट पाहताय, असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या सभेपूर्वी झालेली दंगल, महाविकास आघाडीची सभा आणि उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवरुन रंगलेले राजकारण, राज्यात जाहिरातींवर सरकारकडून केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्चावर पवार यांनी निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पीक विम्याची रक्कम रखडली : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने अद्याप मदत दिली नाही. पीक विम्याची रक्कम रखडली आहे. नियमित परतफेड करणार्या काही अपवाद वगळता बहुतांश शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळालेले नाहीत. पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पात घोषणा केल्या. मंजुरी मिळाली परंतु अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सरकारला थोडा वेळ देऊ, अन्यथा आमची भूमिका मांडून स्पष्ट करु असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांचा आरोप : राज्य शासनाच्याजाहिराती वरूनही अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. सरकारने आतापर्यंत ५५ कोटी खर्च केले असून, पुढे ते १०० कोटी रुपये खर्च करतील. सरकारकडे काहीच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत. लोकांसमोर कसे जायचे हा प्रश्न त्यांच्या समोर असल्याने, एखाद्या प्रॉडक्ट प्रमाणे जाहिरातबाजी करत सुटले आहेत. लोकांनी सरकारच्या या भुलथापांना विसरू नये, जनतेच्याच टॅक्स रुपाने आलेल्या पैशाने सरकारकडून जाहिरातबाजी, उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. सरकारच्या जाहिरातींवरुन पत्रकारांनी पवार यांना विचारले असता, वेगवेगळ्या योजनाबाबत लोकांना जागृत न करता, आपली पोळी भाजत सुटले आहेत. महाविकास आघाडी सरकारने कधी ही अशी जाहिरातबाजी केली नाही, असेही पवार म्हणाले.
पवार यांचे प्रत्युत्तर : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला होता. या आरोपाला पवार यांनी प्रत्युत्तर दिले. केंद्र व राज्य सरकार ताब्यात आहे. तपास करा दूध का दूध पानी का पानी होऊ द्या. लोकांसमोर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नावे घेण्यापेक्षा पोलिसांनी दंगल कुणी घडवली ते शोधून काढावे. यामागे कोण सूत्रधार आहेत ते समोर आणा. जो कुणी दोषी असेल, त्यावर कठोर कारवाई करा. परंतु, त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका असेही अजित पवार यांनी ठणकावले.
रिक्षावाल्याचा उल्लेख: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सडकून टीका करताना, रिक्षावाल्याचा उल्लेख केला होता. अजित पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, सावंत हा माझाच शब्द आहे. पवार साहेबांचा नाही. मी पवारसाहेब यांचे नाव घेतले पण शब्द माझे होते. उध्दवजी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते असे म्हटले होते. त्यामुळे हा वाद अरविंद सावंत यांनी मिटवल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
हे निव्वळ राजकारण सुरू आहे: राज्यात आता गौरवयात्रा काढल्या जात आहेत. परंतु, केंद्रात राज्यात सत्ता असताना सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी मुहुर्त शोधले जात आहे. दुसरीकडे माजी राज्यपालांनी कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व इतर महापुरुषांबद्दल भाजपचे मंत्री, प्रवक्ते आमदार यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली. त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आले नाही? त्या महापुरुषांबद्दल का गौरव यात्रा काढल्या नाहीत. हे निव्वळ राजकारण आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली.