मुंबई- वरळी गांधीनगर परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून जास्त काळ रखडला आहे. याविषयी लोक प्रतिनिधींकडे दाद मागूनही अद्याप समस्या सुटू शकली नाही. त्यामुळे आता प्रकल्पातील रहिवाशांनी विरोध म्हणून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
वरळी धोबीघाट येथील शिव गणेश सोसायटी, शिव साईनाथ सोसायटी व गणेशकृपा वेल्फेअर सोसायटी, अशा तीन सोसायटीचा मिळून विकास करण्यात येणार होता. यात ७५० कुटुंबाना घरे मिळणार होती. मात्र अनेक वर्षांपासून इमारतीचा पुनर्विकास रखडला आहे. इमारतीचे अर्धवट बांधकाम झाले आहे. तसेच गेली तीन वर्षे काहीच भाडे मिळत नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर यायची वेळ उद्भवली असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. याच्या निषेधार्थ वरळी धोबीघाट घर बचाव संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा फलक परिसरात लावला होता. मात्र पोलिसांनी हा फलक त्यांना काढायला लावला.
हेही वाचा- पाळीव मांजरीची छळ करून हत्या; न्यायालयाने ठोठावला 'इतका' दंड
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत. मात्र अजूनही आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळाले नाही. अनेक आंदोलन केली. लोकप्रतिनिधी आश्वसन देतात मात्र पुढे काहीच होत नाही. आमचे तीन वर्षाचे भाडे थकले आहे. जर आम्हाला हे पूर्ण भाडे आणि ठोस आश्वासन मिळाले तरच आम्ही बहिष्कार मागे घेऊ, असे समितीचे प्रविण येरूळकर यांनी सांगितले.
हेही वाचा- वंचितमुळेच इम्तियाज जलील औरंगाबादचे खासदार - आनंदराज आंबेडकर