मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील काही नागरिकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. यावेळी कृष्णकुंजबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. काल मुंबई शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही आज कृष्णकुंज येथे गर्दी पाहून संचारबंदी व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
वरळी विधानसभेतील राज्यपाल पुरस्कारप्राप्त नामांकित समाजसेवक व जागृती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मनोज परब व त्यांचे २०० सहकाऱ्यांनी विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर येऊन मनसेत जाहीर प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि कामाला प्रभावित होऊन आम्ही आमच्या विभागात विकास करण्याच्यादृष्टीने मनसेत प्रवेश केला आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई, औरंगाबाद, ठाणे यासह इतर ठिकाणी मनसेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. औरंगाबाद येथे नेते प्रकाश महाजन आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे समर्थक सुहास दशरथे यांच्या नेतृत्वात अनेक शिवसैनिकांनी गेल्या आठवड्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. यानंतर आज पर्यावरणमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील अनेक शिवसैनिक व नागरिक मनसेत दाखल झाले.