मुंबई - शहरात निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आजही मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेले दोन महिने घरी बसलेल्या नागरिकांनी छत्री खरेदीसाठी दुकानात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
छत्रीच्या दुकानात ग्राहकांची गर्दी असली तरी फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळल्याचे दिसून आले. दुकानातील कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड तर दुकानात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात निर्जंतूक करून सोडण्यात येत होते. छत्र्यांचे 6 महिन्यांपूर्वी बुकिंग केले जाते. तेव्हा जून-जुलै महिन्यांत छत्रीचा पुरवठा होतो. त्यामुळे यंदा लॉकडाऊनमुळे छत्रीच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
लॉकडाऊनमधील नियमात छत्री, ताडपत्री दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत सरकारने केला. यामुळे आम्हा दुकानदारांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगत दुकानदारांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.