मुंबई - शिंदे गटात जाऊन शिवसेनेला आव्हान देणाऱ्या बंडखोरांवर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी जोरदार घणाघात केला. शिंदे गटाचे आमदार यानंतर आक्रमक झाले असून पक्षप्रमुखांनी संजय राऊतांची भाषा बोलू नये, असे विधान बंडखोर आमदार शंभूराज देसाईंनी केले. तुमचाबद्दल आदरांची भावना आहे, असे देसाई म्हणाले. शिवसेनेकडून बंडखोरांवर जोरदार टीका केली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Sanjay Raut ) यांनी आज दै. सामनाला मुलाखत देताना, बंडखोरांवर जोरदार आसूड ओढले. शिवसेनेत सध्या पानगळ सुरू आहे. हा पालापाचोळा गेला असे वक्तव्य ठाकरे यांनी केले. शिंदे गटाचे आमदार जय शिरसाठ यांच्यानंतर शंभूराजे देसाई (Shambhu Raje Desai ) यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
आमदारांमध्ये अस्वस्थता - आमचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी, सातत्याने आमदारांच्या मनातील खदखद पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सांगितली होती. आमदारांच्या मतदारसंघात जाणीवपूर्वक राष्ट्रवादीकडून त्रास दिला जात होता. आमदार अस्वस्थ आहेत. किमान पाच ते दहा वेळा शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. पण त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. हीच आमच्या मनातील खदखद होती. त्यामुळे आम्ही भाजप सोबत युती केली, असे शंभूराजे देसाई म्हणाले.
बाळासाहेब राष्ट्रीय पुरुष - बाळासाहेबांनी उभे केलेली शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे काम केले. जे आमदार एकमताने उठाव करतात त्यांना पाला पाचोळ्याची उपमा देणे योग्य नाही. पक्ष वाढवण्यासाठी या आमदारांनी योगदान दिले आहे. वेळे प्रसंगी संघर्ष केला आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांनी संजय राऊत यांची भाषा बोलू नये. तसेच बाळासाहेब राष्ट्रीय पुरुष आहेत. त्यांना एका कुटुंबापुरतं मर्यादित ठेवू नये, बाळासाहेब संपूर्ण देशाचे हिंदूहृदयसम्राट आहेत, असे देसाई यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.