मुंबई: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अभिजात मराठी जनअभियान या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लेखक रंगनाथ पठारे, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, संगीतकार कौशल इनामदार, भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने विविध उपक्रम राबवत आहेत. तसेच मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळावा यासाठी जनअभियान सुरु केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पोस्टकार्ड पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत 25 हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 10 हजार कार्ड महिला बचत गटांनी पाठवल्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.
ज्ञानभाषा, राजभाषा, लोकभाषा आदी अभिजात दर्जासाठीच्या सर्व निकषांवर मराठी भाषा पात्र ठरली आहे. प्राचिन पुरावे सांगणारे अहवालच रंगनाथ पठारे समितीकडून केेंद्र सरकारला 12 जुलै 2013 रोजी सादर केले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली. संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेत संसदीय कार्य, संस्कृती मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्याची कार्यवाही लवकरच कार्यवाही केली जाईल, घोषणा केली आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. त्या दिवशी किंवा त्याआधी अभिजात दर्जा मिळाला तर आनंदाची गोष्ट आहे, असे देसाई म्हणाले. दरम्यान, ‘शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे’ हा 17 मिनिटांचा एक लघुपटही दाखविण्यात आला. हा लघुपट सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात येणार असून विद्यार्थी व प्राचार्य यांनी चर्चा घडवून आणावी असा उपक्रम हाती घ्यावा, अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना केल्याचे ही मंत्री देसाई यांनी सांगितले.