मुंबई - कोरोना रुग्णाचा मृतदेह मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विद्युत वाहिनीवर जाळला जात आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील मृतदेहही पालिका कर्मचारीच पुरतात. असे असताना आता मुंबईतील पारशी समाजाने पारशी कोरोना रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यावा, तसेच त्यावर धार्मिक पद्धतीने सर्व विधी करत डुंगरवाला (विशिष्ट पद्धतीची विहीर) मध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई महानगर पालिकेकडे केली आहे. त्यांच्या या मागणीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर, ही मागणी मान्य करून घ्यावी यासाठी आता बॉम्बे पारशी पंचायतीवर समाजाकडून दबाव वाढत असल्याने आता त्यांच्यासमोरही पेच निर्माण झाला आहे.
![डुंगरवाला : पारशी समाजाचे अंत्यसंस्कार करण्याचे धार्मिक स्थळ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/06:33_mh-mum-03-7209214-corona-parasi-bmc_12062020171520_1206f_1591962320_726.jpeg)
केरोनाची भीती आणि वेगाने होणारा संसर्ग पाहता केरोना रुग्णाच्या मृतदेहावर कोणतेही संस्कार न करता एका बॅगमधून मृतदेह नेत विद्युत वाहिन्यावर जाळला जात आहे. यावर मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाने आक्षेप घेत मृतदेह पुरण्याची परवानगी मिळवली. मात्र, मृतदेह नातेवाईकांना न देता 10 फुटाचा खड्डा खणत पालिका कर्मचारीच तो पुरतात. एकूणच कुठल्याही मृतदेहावर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार होत नाहीत. कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वांनीच ते स्वीकारले आहे. पण, आता मात्र पारशी समाजाने थेट पारशी कोरोना रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर मृतावर सर्व धार्मिक विधी करण्याची तसेच डुंगरवालामध्ये मृतदेह गिधाडांच्या हवाली करण्याचीही परवानगी हवी, असल्याचे म्हटले आहे. तसे पत्र बॉम्बे पारशी पंचायतीने पालिकेला पाठवले आहे. पण ही मागणी पालिकेने फेटाळून लावली आहे.
याबाबत पंचायतीचे ट्रस्टी विराफ मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येने आमच्या लोकांनी ही मागणी केली, त्यानुसार आम्ही हे पत्र पाठवले. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाला मृतदेह पुरण्याची परवानगी मिळते. पण, आम्हाला मात्र डुंगरवालात अंत्यसंस्कार करण्यास परवानगी नाकारली जाते. यामुळे आमचा समाज नाराज आहे. आतापर्यंत 2 ते 3 पारशी कोरोना मृतदेह पालिकेकडून विद्युत वाहिनीत जाळण्यात आले आहेत. धर्मानुसार असे केल्याने आत्म्याला मुक्तता मिळत नाही, अशी आमची धारणा आहे. त्यामुळेच आम्हाला अंत्यसंस्कार करण्याची परवानगी हवी आहे, असेही मेहता म्हणाले.
अभ्यासानुसार आणि पालिकेने न्यायालयातच दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. असे असेल तर मग डुंगरवालामध्ये अंत्यसंस्कार करण्यास नकार का, असा सवाल पारशी समाज करत आहे. त्यांचीही मागणी पालिकेने फेटाळून लावली आहे. पण, त्यानंतरही लोकांचा प्रचंड दबाव पंचायतीवर आहे. परवानगी मिळाली आणि चुकून काही अघटित अर्थात संसर्ग वाढला तर काय होईल, असा विचार पंचायत करत आहे. जे होईल ते होईल पण ही परवानगी मिळवावी असा दबाव असल्याने पंचायतीसमोर पेच निर्माण झाला आहे. आता हा पेच सुटतो की आणखी वाढतो, हे लवकरच समजेल.