मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमीत्त मुंबई महापालिकेच्या शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याच्या बक्षिस वितरणासाठी प्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधर आणि राणी गुणाजी आल्या होत्या. यावेळी त्यांनी चित्रांची स्तुती करत ते विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. पालिका शाळा केवळ कला गुणांनाच वाव देत नाही, तर बुद्धीमतेलाही वाव देते, असे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्य्क्त केले.
बक्षिस वितरण सोहळा माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात झाला. या कार्यक्रमाला 'हम बने तुम बने' फेम अभिनेत्री आदिती सारंगधर आणि राणी मिलींद गुणाजी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या चित्रकलेने दोघीही स्तिमीत झाल्या. ही चित्रे विक्रीसाठी ठेवली तर आपण ती विकत घेऊ, अशी इच्छा आदिती सारंगधरने व्यक्त केली. तर, ही चित्रे घराच्या भिंती सजवण्या इतकी सुंदर असल्याचे राणी मिलींद गुणाजी म्हणाल्या.
यावेळी शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की महानगरपालिकेचा दर्जा घसरल्याची टीका नेहमीच होत असते. पण, महापालिका शाळा विद्यार्थ्यांच्या सर्व गुणांना वाव देतात. यावेळी त्यांनी ऑलिंपियाड परिक्षेचा दाखला दिला. ऑलिंपियाड परिक्षेसाठी ६ हजार २०० विद्यार्थी बसले होते. त्यातील ५०० विद्यार्थी परिक्षेस पात्र ठरले. यातील १५० विद्यार्थी महापालिका शाळेतील आहेत. ही पालिकेसाठी गौरवाची बाब असल्याचे सातमकर म्हणाले.