मुंबई Romine Chheda Arrest : कोविड काळात ऑक्सीजन जनरेशन प्लांटची (Oxygen Plant Scam Case) उभारणीमध्ये 60 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी प्रिनाम परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री उशिरा नागपाडा पोलीस ठाण्यात रोमिन छेडा याच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम 418, 465, 467, 468, 471, 218, 120 ब आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने समन्स पाठवून गुरुवार आणि शुक्रवारी आरोपी रोमिन छेडा याला चौकशीला बोलावले. त्यानंतर शुक्रवारी तपासाअंती रोमिनला अटक केली आहे.
रोमिन छेडाला अटक : रोमिन छेडा (वय 42)हा बोरिवलीत राहणारा असून, बोरिवलीत त्याचे डिपार्टमेंटल स्टोअर आहे. त्याचप्रमाणे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे पावर ऑफ ॲटर्नी देखील रोमिन छेडा याच्या नावाने असून, याच कंपनीच्या नावाने ऑक्सिजन प्लांट जनरेशनसाठी उपकरणे देण्याचे महापालिकेकडून कंत्राट मिळवले होते. गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छेडाची चौकशी केली. त्यानंतर शुक्रवारी देखील सकाळी 11 वाजता छेडा याला चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बोलावले होते. मात्र, दुपारी एक वाजताच्या सुमारास रोमिन छेडा आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आला. त्यानंतर पाच वाजेपर्यंत चौकशी केल्यानंतर पाच वाजून पाच मिनिटांनी रोमिन छेडा याला अटक करण्यात आली. शनिवारी छेडाला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
प्रकरणाचा अधिक तपास सुरू : आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासात रोमिन छेडा याचा सहभाग दिसून आल्याने त्याला अटक करण्यात आली. या सहा कोटींच्या ऑक्सिजन प्लांट घोटाळ्यात अजून कोणा कोणाचा सहभाग आहे हे पुढील तपासानंतर उघडकीस येईल.
काय आहे प्रकरण? : नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी दोन कंत्राट दिली होती. त्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या नऊ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीच्या कंत्राटाचे काम हे संबंधित साईट कंत्राटदाराच्या ताब्यात दिल्यापासून 30 दिवसात पूर्ण करावयाची अट संबंधित निविदेत नमूद होती. मात्र, या अटीप्रमाणे कंत्राटदार हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 30 दिवसांत काम पूर्ण न झाल्याने त्यांना निवेदेतील अटी- शर्तीनुसार मुंबई महानगरपालिकेने एकूण तीन कोटी 16 लाख 32 हजार 426 रुपयांचा दंड आकारला असल्याचे नमूद करण्यात आले. वी एन देसाई रुग्णालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, जीटीबी रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, नायर रुग्णालय, कुपर रुग्णालय, भाभा रुग्णालय, के एम रुग्णालय आणि सायन रुग्णालय अशी नऊ रुग्णालये कंत्राटदाराच्या ताब्यात देऊन ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी देण्यात आली होती.
हेही वाचा - बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची ईडीनं केली ६ तास चौकशी