मुंबई : लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रकिया करायची म्हटले तर डोळ्यासमोर येते खाजगी रुग्णालय आणि त्यासाठी होणारा अमाप खर्च. महागड्या उपचारामुळे ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जास्त कुणी धजावत नाही. लठ्ठपणामुळे रुग्णांना हृदयविकार, मधुमेह, गूढघा बदलण्याची शस्त्रक्रिया अशा विविध आजारांना सामोरे जावे लागते. खाजगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी पाच ते सात लाख रुपये खर्च येतो. मात्र, मुंबईतील जे जे (J J Hospital)या शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया दोन लाख रुपयांत होते. मुंबईतील जे जे रुग्णालयात मागील दहा वर्षांपासून लठ्ठपणा कमी करण्याच्या यशस्वी क्रिया केल्या जात आहेत व आतापर्यंत दहा वर्षांमध्ये ४०० रुग्णांवर लठ्ठपणा कमी करण्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. (overweight patients preferred J J Hospital to get slim trim)
रुग्णालयाच्या सेवेचा चांगला अनुभव : काही दिवसापूर्वीच वरळी येथील शमीम बानू या ५१ वर्षाच्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिचे वजन १०७ किलो होते. त्यामुळे त्यांना दैनंदिन काम करण्यात बऱ्याच अडचणी येत असत. चालताना सुद्धा त्यांना दम लागत होता. ही शस्त्रक्रिया करण्या अगोदर बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) शरीराचे वजन व उंची यांचे गुणोत्तर बघून शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले जाते.शमीम बानू यांनी सांगितले की, त्यांचं वजन फार वाढल्या कारणाने डॉक्टरांनी त्यांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. बऱ्याच ठिकाणी चौकशी केल्यानंतर व एकंदरीत खर्च बघितल्यानंतर शेवटी त्यांनी जे जे रुग्णालय हा पर्याय निवडला. येथे अतिशय वाजवी दरामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.आता त्या त्यांच्या दोन लहान मुलांचे संगोपनही व्यवस्थित करू शकतील असेही त्यांनी सांगितले आहे. तसंच त्यांना रुग्णालयाच्या सेवेचा चांगला अनुभव आल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
निरोगी आरोग्यासाठी शस्त्रक्रिया : पूर्वी एक गैरसमज होता की, ही शस्त्रक्रिया सुंदर दिसण्यासाठी करतात. मात्र ही शस्त्रक्रिया निरोगी जीवनासाठी वरदान आहे. ज्यावेळी रुग्ण व्यायाम करून आणि इतर प्रयत्नाने सुद्धा वजन कमी करीत नाहीत त्याचे खूप मोठया प्रमाणात वजन वाढून त्यांना अन्य आजारांना सामोरे जावे लागते. तेव्हा अशा पात्र रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात असे जे जे रुग्णालयाचे शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले आहे. तसेच बऱ्याचदा रुग्णांना गुडघ्याची शस्त्रक्रिया सांगितली जाते परंतु लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर बऱ्यापैकी वजन कमी होतं व कधीकधी बऱ्याच प्रकरणांमध्ये गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागत नाही. तसेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया केल्यानंतर बऱ्याचदा त्यांचं मधुमेहावर असलेल्या औषधाचे प्रमाण कमी होतं व बऱ्याच प्रकरणात ती कायमची बंद सुद्धा होतात. हा एक मोठा फायदा या शस्त्रक्रियेचा होतो, असेही डॉक्टर भंडारवार यांनी सांगितले आहे. यासाठी जो खर्च येतो त्यातून या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या काही गोष्टी बाहेरून विकत आणाव्या लागतात. शमीम बानू या महिलेवर गॅस्ट्रिक बायपास ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये जठराचा आकार सुमारे ३० मिलिमीटर इतका लहान केला होता असे जे जे रुग्णालयाचे शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल वाघ यांनी सांगितले आहे.