मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत ( measles cases Mumbai ) आहे. पालिकेच्या २४ पैकी १६ विभागात गोवरचा प्रसार झाला आहे. आतापर्यंत निश्चित निदान झालेले एकूण ३८६ रुग्णांची तर ४५०८ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवरमुळे आतापर्यंत १५ मुलांचा मृत्यू झाला (15 children measles died ) आहे. त्यापैकी १२ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. सध्या २५ रुग्ण ऑक्सीजनवर, ५ रुग्ण आयसीयुमध्ये तर ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
२५ रुग्ण ऑक्सीजनवर, २ व्हेंटिलेटरवर : मुंबईत ६५ लाख ६३ हजार ९५७ घरांचा सर्व्हे करण्यात आला ( Increase measles cases in Mumbai ) आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ४५०८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ३८६ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १११ बेडवर रुग्ण असून २१९ बेड रिक्त आहेत. १४९ जनरल बेडपैकी ८१, १४६ ऑक्सीजन बेड पैकी २५, ३५ आयसीयु बेडपैकी ५ बेडवर रुग्ण आहेत. २० व्हेंटिलेटर असून त्यापैकी २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १८ हजार ४८४ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या १ लाख ८८ हजार ०१३ मुलांना लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ महिने पेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे. अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ३५६९ बालकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत १२ तर बाहेरील ३ मृत्यू : मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १५ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १२ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील ( Mumbai 12 measles patients died ) आहे. मुंबईमधील एकूण १२ मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. ४ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
या उपाययोजना : गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
कोरोनाचा प्रसार आटोक्यात : गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला ( Corona less in Mumbai ) आहे. गेले तीन दिवस एक आकडी रुग्णांची नोंद होत आहे. आज ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली असून अडीच वर्षात १८१ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही घट होऊन ५१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाचे ८ नवे रुग्ण : मुंबईत ३ डिसेंबरला २४८९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ५४ हजार ९२४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार १२९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९५,७४८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००१ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्येत उतार सुरू : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट
झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे.१७ नोव्हेंबरला २६, १८ नोव्हेंबरला १३, १९ नोव्हेंबरला ८, २० नोव्हेंबरला १५, २१ नोव्हेंबरला १०, २२ नोव्हेंबरला १२, २३ नोव्हेंबरला १४, २४ नोव्हेंबरला १०, २५ नोव्हेंबरला १८, २६ नोव्हेंबरला १५, २७ नोव्हेंबरला १६, २८ नोव्हेंबरला ६, २९ नोव्हेंबरला ६, ३० नोव्हेंबरला ८, १ डिसेंबरला २, ३ डिसेंबरला ८ रुग्णांची नोंद झाली आहे.
१८१ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ११ वेळा, ऑक्टोबर महिन्यात २४ वेळा, नोव्हेंबर महिन्यात २४ वेळा, डिसेंबर महिन्यात ३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १८१ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.